मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विविध स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांमधील या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, उमेदवारी आणि राजकीय समीकरणांना आता वेग येण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसह एका जागेसाठीची पोटनिवडणूक पार पडणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या १६ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेचे संख्याबळ घटले होते, जे आता पुन्हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काही धक्कातंत्र दिसणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे या मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. नियमानुसार, संबंधित मतदारसंघातील एकूण सदस्यांपैकी किमान ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असेल, तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. सध्या ही अट पूर्ण होत आहे. त्यामुळेच आज निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून देण्यात येणार्या १६ जागांसह एका जागेची पोटनिवडणूक होईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी मतमोजणी, निकाल कधी?
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.
विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात. आता, त्याच जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, नागपूर आणि संभाजीनगर-जालना यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि धाराशिव-लातूर-बीड या मतदारसंघांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीमुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकांच्या हालचालींनाही वेग आला आहे.
असा निवडणूक कार्यक्रम...
१. अधिसूचना जारी करणे: २५ मे, २०२६ (सोमवार)
२. उमेदवारी अर्ज (नामांकन) दाखल करण्याची अंतिम तारीख: ०१ जून, २०२६ (सोमवार)
३. उमेदवारी अर्जांची छाननी: ०२ जून, २०२६ (मंगळवार)
४. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ०४ जून, २०२६ (गुरुवार)
५. मतदानाचा दिवस: १८ जून, २०२६ (गुरुवार)
६. मतदानाची वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
७. मतमोजणी: २२ जून, २०२६ (सोमवार)
८. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख: २५ जून, २०२६ (गुरुवार)
कोणकोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना
सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे
सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
अहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
सांगली-कम-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
भंडारा-कम-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड: सुरेश धस
परभणी-कम-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
औरंगाबाद-कम-जालना: अंबादास दानवे